कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असून या लाटेचा परिणाम लहान मुलांवरही होऊ शकेल असा अंदाज अनेक डाॅक्टरांनी दर्शवला आहे. याच अनुषंगाने येरवडा भागातील भारतरत्न राजीव गांधी हॉस्पिटल मध्ये लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल बनविले जात आहे.
राज्यातील हे पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल असणार आहे. या हॉस्पिटलमध्ये एकूण २०० बेडची सुविधा असणार आहे. त्यामध्ये ऑक्सीजन बेडची संख्या १५० तर आयसीयू बेडची संख्या ५० असणार आहे.
पुण्यातील वडगाव शेरी विधानसभेचे आमदार सुनील टिंगरे यांच्या फंडातून एक कोटी रुपयांचा फंड या हॉस्पिटलसाठी देण्यात आला आहे. सोबतच सीएसआर अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात फंड उपलब्ध करून दिला आहे.
शुक्रवारी दिनांक ७ मे रोजी अतिरिक्त मनपा आयुक्त रूबल अग्रवाल यांच्या सोबत आमदार सुनील टिंगरे यांनी हॉस्पिटलची पाहणी केली. यावेळी आवश्यक सुविधांची माहिती घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच छोट्या मुलांसाठीचे कोविड सेंटर उभे राहिल.