26 जानेवारी दिनी अयोध्या मशिदीची पायाभरणी, डिझाईन झालं प्रसिद्ध

26

बाबरी मशीद-राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पडदा पडला. सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या वादग्रस्त मुद्द्यावर निकाल दिला होता.सर्वोच्च न्यायालयानं वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्याचे आदेश दिले होते. तर बाबरी मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्याचे आदेश दिले होते.

इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्टने शनिवारी अयोध्येतील धन्नीपूर गावात उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे संकल्पचित्र प्रसिद्ध केले आहे. अयोध्येपासून ३० किमी अंतरावर असलेल्या या गावात मशिदीसाठी५ एकर जागा देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले होते. अयोध्येतील मशीद उभारण्याचे काम २६ जानेवारीपासून सुरू करण्याची तयारी देखील केली जात आहे. तसेच, अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणाला देखील सुरुवात झाली आहे. अयोध्येच्या धन्नीपूर येथील भागात मशीद उभारली जाणार आहे.

या प्रकल्पाचे मुख्य आर्किटेक्ट प्रोफेसर एस.एम. अख्तर हे आहेत. तसेच आयआयसीएफने १९ डिसेंबर रोजी मशिदीची ब्लू प्रिंट सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. मशिदीच्या परिसरामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कम्युनिटी किचन आणि ग्रंथालय असेल. अख्तर यांनी सांगितले की मशिदीत एकावेळी दोन हजार लोक नमाज पडू शकतील. मशीदीची रचना गोलाकार असेल. गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्यामधील विवादित रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा केला आणि मशीद बांधण्यासाठी केंद्राला सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्याचे निर्देश दिले आहेत.

या मशिदीचा एक फोटोही समोर आला आहे. ज्यामध्ये मशिदीच्या वर मीनार आणि घुमट आहे. जर वेळेत परवानग्या मिळाल्या नाही, तर २६ जानेवारी ऐवजी दुसरी तारीख ठरवली जाईल, अशी माहिती ट्रस्टने दिली आहे. मशिदीच्या शेजारीच रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचं ट्रस्टने काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. या पाच एकर जागेवर इंडो-इस्लामिक कल्चर संशोधन केंद्र (रिसर्च सेंटर), धर्मदाय रुग्णालय, कम्युनिटी किचन, संग्रहालय आणि सार्वजनिक ग्रंथालय उभारण्यात येणार आहे.