सरकारने कोरोना चाचण्यांचे दर केले कमी,आता ‘इतक्या’ रुपयांत होणार कोरोना चाचणी

22

कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य शासनाने सहाव्यांदा कपात करत 980 रुपयांऐवजी 700 रु. हा दर निश्चित केल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत केली.

राज्यात कोरोना चाचण्यांचे दर सातत्याने कमी केले जात असून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या 4500 रुपयांवरुन आता 700 रुपयांमध्ये खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या होणार आहेत. राज्य शासनाने कोरोना उपाययोजनांसंदर्भात निर्णय घेताना सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून निर्णय घेतले. चाचण्यांचे दर कमी करतानाच खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राखीव ठेवल्या.

‘एचआरसीटी’ चाचण्यांचे दर निश्चित केले. प्लाझ्मा बॅगचे दरदेखील निश्चित करण्यात आले. मास्कच्या किमतीवरही नियंत्रण आणले गेले. या सर्व उपाययोजना करतानाच नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सारख्या मोहिमेद्वारे आरोग्य तपासणीसोबतच जाणीव जागृतीदेखील करण्यात आली.

राज्यात कोरोना काळात सर्व नागरिकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू केली. त्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत रक्त देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.