मराठा साम्राजाचा इतिहास केवळ राष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी असेल :योगी आदित्यनाथ

9

आग्रा येथील संग्रहालयाला योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच नाव दिल आहे .याच पार्श्वभूमीवर छत्रपती उदयनराजें भोसले यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संवाद साधत लवकरच तुमची भेट घेणार असल्याचं सांगितले होते, त्यानंतर शनिवारी त्यांनी  भेट घेतली.

आम्ही आग्रा येथील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले असून या संग्रहालयच्या माध्यमातून मांडला जाणारा मराठा साम्राजाचा इतिहास केवळ राष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी असेल. असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथे मुख्यमंत्री निवासस्थानी केले.

महाराजांचा गनिमी कावा साऱ्या जगाने गौरविलेला आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा निस्सिम भक्त असून त्यांच्या स्वराजातून आजही आम्हाला मोठी प्रेरणा मिळत आहे. त्यांच्यासारख्या राष्ट्रपुरूषांचा इतिहास जगापुढे आणला पाहिजे. आजही अनेक देशात या तंत्रांचा वापर केला जातो. ही अभिमानाची बाब असल्याचे योगी यांनी सांगितले.

आपण याआधी एकदाच सातारा येथे आल्याची आठवण सांगून लवकरच प्रतापगडाला भेट देण्याचे आश्वासन दिले. गडावरील भवानी मातेची पूजा करून अफझल खानाला याच मातीत गाडल्याचा इतिहास प्रत्यक्ष जाणून घेण्याचे आश्वासन योगी यांनी दिले.

उत्तरप्रदेशात संग्रहालयाच्या रुपाने राष्ट्रीय स्मारक उभारल्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. यावेळी संग्रहालयासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वस्तू, शस्त्र, दस्तऐवजाच्या प्रतिकृती घराण्याच्यावतीने आम्ही देऊ असे योगी आदित्यनाथ यांना उदयनराजेंनी सांगितले.