गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात अतिदुर्गम अबुझमाड जंगल परिसरात आज पोलिसांनी नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्रे तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. शस्त्र कारखाना उद्ध्वस्त करण्यात यश मिळवल्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
विशेष अभियान पथकाचे (सी-६०) जवान महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील मुरुमभुशी गावाजवळील जंगलात गुरुवारी नक्षलविरोधी अभियान राबवत होते. त्यावेळी त्यांना या भागात काही संशयास्पद कारवाया दिसून आल्या. पोलिसांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला.
या परिसरात शस्त्रांचा कारखानाच आढळून आल्याने या भागात आणखी नक्षली दबा धरून बसले असल्याचा संशय बळावला होता. त्यामुळे आज परिसरात परत शोध घेण्यासाठी सी-६०चे जवान पाठविण्यात आले.
४८ तासांहून अधिक काळ ही मोहीम सुरू होती. या मोहिमेत एक पोलिस जवान जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आले.