प्रेमभंग झाल्याच्या रागातून जोगेश्वरी येथे 24 वर्षीय तरुणीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेयसीला जिवंत जाळण्यासाठी गेलेला प्रियकर देखील आगीत जळाला आहे.
मुंबईतील जोगेश्वरी भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेली प्रेयसी रुग्णालयात आहे. जोगेश्वरी पूर्व मेघवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. मयत तरुण आणि प्रेयसी या दोघांचे जवळपास अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र दोघांमध्ये काही काळापासून भरपूर गैरसमज आणि भांडण होत होती.
विजय खांबे (वय 30) असं मृत तरुणाचे नाव आहे. विजयचे आपल्या मेव्हण्याच्या धाकड्या बहिणीशी गेल्या अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. विजयला त्याच मुलीशी लग्न करायचे होते. मात्र हा प्रस्ताव मुलीच्या आई-वडिलांनी फेटाळून लावला. विजयला दारू पिण्याचे व्यसन जडले होते. त्यामुळे काही दिवसांनी मुलीनेही विजयशी लग्न करण्यास नकार दिला होता.
पीडित घरी एकटीच असल्यामुळे विजयने घरात प्रवेश केला. विजय आणि पीडितेमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर त्याने आपल्यासोबत आणलेली पेट्रोलची बाटली पीडितेच्या अंगावर ओतून पेटवून दिले. तरुणी ओरडत होती. मात्र विजय दारातच उभे राहून सर्व पाहत होता. यावेळी तरुणी स्वतःचा बचाव करत असताना आरोपी तिच्या संपर्कात आत आल्यामुळे जळून त्याचा मृत्यू झाला आहेत.
पीडित तरुणीही 80 टक्के भाजली असून तिच्यावर जे.जे. मार्ग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तरुणीच्या भावाच्या यांच्या जबाबावरून आरोपी खांबेविरोधात भादंवि कलम 307 अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.