मराठा आरक्षणावरील मॅरेथॉन सुनावणीला सुप्रीम कोर्टात आजपासून होणार सुरुवात

8

मराठा आरक्षणावरील मॅरेथॉन सुनावणी आजपासून होणार आहे. याआधी 5 फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने मॅरेथॉन सुनावणीबाबतचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. 

8 मार्च ते 18 मार्च या दरम्यान ही मॅरेथॉन सुनावणी पार पडणार आहे. आजपासून 8, 9 आणि 10 मार्चला आरक्षणाचे विरोधक म्हणजेच याचिकाकर्त्यांची ऐकून घेतली जाईल. 

या सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला जाऊ शकतो. सुप्रीम कोर्टाने याबाबतच वेळापत्रक निश्चित केलं आहे. केंद्र सरकारचे वकील देखील यात बाजू मांडणार आहेत.

न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठामध्ये नागेश्वर राव, हेमंत गुप्ता, रवींद्र भट आणि अब्दुल नाझीर या न्यायमूर्तीचा समावेश आहे. मराठा आरक्षणावरील 20 जानेवारीच्या सुनावणीत सर्व पक्षकारांच्या वकिलांनी ‘सुनावणी ऑनलाईन न होता ती प्रत्यक्षात व्हावी’, अशी मागणी केली होती.

दरम्यानच्या काळात हे प्रकरण 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे चालवण्यात यावं, अशी याचिका राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीबाबत कोर्टाचं म्हणणं काय असेल, हे पाहणं निर्णायक ठरणार आहे.

 तर 12, 15, 16 आणि 17 तारखेला आरक्षणाचे समर्थक म्हणजेच मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि राज्य सरकारची बाजू मांडली जाईल.