पुणे शहरावरील कोरोनाचे संकट अद्यापही दूर झालेले नाही. अशातच भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या शाही विवाह सोहळ्याच्या चौकशीचे आदेश पुण्याचे पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत. या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टंसींगचा फज्जा उडाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यावरून सर्वसामान्यांना वेगळा आणि लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय का, असा प्रश्न जनतेनेउपस्थित केला आहे.
आमदार राम सातपुते यांचा विवाहसोहळा रविवारी संपन्न झाला. त्यांच्या विवाह सोहळ्यात 200 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते, त्यामुळे नियमांचे पालन झाले की नाही, या प्रकरणी आता चौकशी करण्यात येत आहे. याची चौकशी करण्याचे आदेश पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत. आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्यात कोरोनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीवन जगदाळे यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये अत्यंत थाटामाटात आमदार राम सातपुते यांचा विवाहसोहळा पार पडला होता. मात्र सातपुतेंच्या लग्नात पाहुण्यांची खूप गर्दी असल्यामुळे सोशल डिस्टन्सचे नियम मोडलेले दिसत आहेत. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी लग्नाला उपस्थित होते. लग्न सोहळ्यातील फोटोमध्ये अनेक पाहुणे आणि नेते मंडळींनी तोंडाला मास्क लावला नसल्याचे पाहायला मिळाळे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जगदाळे यांच्याकडून याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर सातपुते यांचा विवाह सोहळा वादात सापडला.