महादेव जानकर आणि शरद पवार यांच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण

6

पुण्यातील मांजरी या ठिकाणी असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटमध्ये शरद पवार आणि महादेव जानकर यांची भेट झाली. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली .गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर नाराज आहेत अशा चर्चांना उधाण आले होते. जानकरांनी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या असून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. काही लोक या भेटीचा वेगळा अर्थ काढत आहेत . मात्र असे करणे म्हणजे पराचा कावळा करण्यासारखे आहे . आमची भेट काही वेळापुरतीच होती . त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.आम्ही एनडीएत आहोत ,असे स्पष्टीकरण जानकर यांना करावे लागले.

मी शरद पवार आणि अजित पवार यांना भेटणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनाही कळवले आहे असे जानकर यांनी म्हटले आहे. या भेटीनंतर महादेव जानकर यांनी स्पष्टीकरण केले असले तरी आमचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या परवान्यासंदर्भात मी शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली . त्यांच्या भेटीनंतर कारखान्याच्या परवान्याचे कामही झाले आहे असेही जानकर यांनी सांगितले.