सहा वर्षीय चिमुकल्याची हत्या, बोरांच्या वाटणीवरून मित्रानेच संपवलं

12

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नवी अंतुर्ली शिवारात सहा वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आला होता. बुधवारी रात्री ही घटना उघडकीस आली. चिमुरड्याची दगडाने ठेचून हत्या झाल्याचं समोर आल्याने धुळ्यात एकच खळबळ उडाली होती.

सहा वर्षीय चिमुकल्याच्या हत्याप्रकरणी धुळे पोलिसांना अवघ्या काही तासात यश आलं आहे. बोरांच्या वाटणीवरुन झालेल्या भांडणाच्या रागातून बालकाची  हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. मयत बालकाच्या अल्पवयीन मित्रानेच दगडाने ठेचून ही हत्या केल्याचा आरोप आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, श्वान पथक, सायबर क्राईम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आदींचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. लवकरच यात अजून काही धागेदोरे सापडतात क याचा पोलीस तपास करणार आहेत.