कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज स्वतः रस्त्यावर उतरत नाशिक शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व नागरिकांना सरकारने जारी केलेल्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ना. छगन भुजबळ यांनी नाशिकच्या सिडको परिसरातील विविध ठिकाणांची आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी केली. तसेच त्यांनी बाजारपेठेतील व्यापारी व व्यावसायिकांशी चर्चा केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.