राज्य सरकार कधी जाईल अशी शक्ती काम करत आहे, याची खात्री आता राज्यातील जनतेला होत आहे. मागच्या काही काळापासून भाजपचे नेते आणखी एक मंत्री जाणार, अशा वावड्या उठवत आहेत. त्यानंतर एनआयएचे पत्र बाहेर आले आहे.
भाजपाचे नेते बोलतात त्यानंतर एनआयएकडून काही माहिती बाहेर येते म्हणजे तपास सुरु आहे की राजकारण सुरु आहे, हे कळायला मार्ग नाही, असे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्रीजयंत पाटील म्हणाले.
सुशांत सिंह प्रकरणात जे झाले ते सर्वांना माहिती आहे. कितीही हाकाटी पिटली तरी वस्तुस्थिती लोकांच्या कधी ना कधी समोर येतेच. अँटेलियाबाहेर ज्याने स्फोटकाची गाडी ठेवली, ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे, अशा आरोपीच्या पत्रावर विश्वास ठेवावा का? असा सवालही जयंत पाटील यांनी विचारला.
अँटेलियाबाहेर गाडी उभी केल्याचे मुळ प्रकरण असताना इतर प्रकरणाची चर्चा वाढविण्यात येत असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. कोरोनापासून लोकांचे रक्षण व्हावे, याकडे विरोधी पक्षाचे लक्ष नसून सतत सत्ता हस्तगत कशी करता येईल यावरच त्यांचे जास्त लक्ष आहे. असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.