पावसाळ्यात पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प किंवा विमान उडाण रद्द अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही सर्रास पणे बघत असता. त्यात आता फारसे नवलही वाटत नाही. पावसात हेलिकॉप्टर चे अपघात झालेले सुद्धा तुम्ही पाहिले असतील. पण एका ठिकाणी बर्फात विमान अडकल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. त्यानंतर जे काही घडले ते तोंडात बोटे घालायला लावणारेच होते.
काश्मीरमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. यामुळेच रस्ते तसेच विमान वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. काश्मीर खोऱ्यातील सामान्य जनजीवनही विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने काही गावांचा संपर्कही तुटला आहे. काश्मीरमधील या बर्फवृष्टीचे फोटो सोशल नेटवर्कींगवर चांगलेच व्हायरल झालेत.
जम्मू आणि काश्मीरमधील बर्फवृष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे की १३ जानेवारी रोजी दिल्लीच्या दिशेने उड्डाण घेण्यासाठी निघालेल्या विमानाचे उड्डाणही थांबवावे लागले आणि ते ही चक्क विमान बर्फामध्ये अडकल्याने. श्रीनगरहून दिल्लीला येणाऱ्या या विमानामध्ये एकूण २३३ प्रवासी होते. मात्र विमानाने उड्डाण घेण्याआधीच ते बर्फामुळे ओल्या झालेल्या रनवेच्या नियोजित मार्गापासून सरकले आणि बाजूला असणाऱ्या बर्फात अडकले.
सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही कोणत्याही पद्धतीची दुखापत झाली नाही. मात्र विमानाच्या उड्डाणासाठी नक्कीच उशीर झाला. या घटनेनंतर कंपनी तसेच विमानतळावरील अधिकाऱ्यांनी विमानाकडे धाव घेतली. विमानाचा उजवा पंखा बर्फाखाली अडकल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हळूहळू तो बर्फ फोडण्यात आला.
बर्फ बाजूला केल्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर या विमानाने उड्डाण केलं. या सर्व गोंधळात प्रवाशांचे काही तास वाट पाहण्यातच गेले. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनेही दिलं आहे. मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळे रुग्णवाहिका सारख्या अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या आहेत. आपत्कालीन परिस्थिती मध्ये जीवावर कसरत करून लोकांना काम करावे लागत आहेत.
जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी ही बर्फवृष्टी म्हणजे नैसर्गिक संकट असल्याची घोषणा केलीय. या घोषणेमुळे सरकारला स्थानिकांना वेगवेगळ्या योजनांअंतर्गत मदत करता येणार आहे. नायब राज्यपालांच्या घोषणेमुळे नैसर्गिक संकटानंतर झालेलं नुकसान हे वेगवेगळ्या पद्धतीच्या आर्थिक मदतीच्या रुपात भरून काढण्यासाठी स्थानिकांना मदत होणार आहे.