मराठा समाजाच्या आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यात सरकारला आपली बाजू मांडता आली नाही. सरकार मराठा समाजाती थट्टा करत आहे. शांत आणि संयमी आंदोलन करणाऱ्या मराठ्यांची भविष्यात सरकारविरूध्द आक्रोश मोर्चे सुरु होतील, असा इशारा भाजपचे जिल्हा (ग्रामीण)जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज सरकारला केला आहे.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याबाबत तूर्तास नकार देण्यास आला आहे. यापुढील सुनावणी जानेवारीत होणार आहे. याबाबत आज महत्वाची सुनावणी होती. सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली. या निर्णयाकडे मराठा समाजाचे लक्ष लागले होते. स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारनं चार वेळा अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी झाली.
न्यायालयात मराठा समाजाची भूमिका मांडण्यासाठी आमची तयारी आहे, हे वारंवार सांगणारे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे वाटतच नाही. सरकार मराठा समाजाची बाजू मांडू शकत नाही. याचा निषेध केला पाहिजे. शांत असणारा मराठा आता तीव्रतेने सरकार विरूध्द आक्रोश करेल, असा इशाराही घाटगे यांनी दिला.