काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचं नाव निश्चित केलं आहे.पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रिपदाचीही मागणी केल्याने काँग्रेस समोर अडचणी निर्माण झाल्या होत्या.
शिवसेनेने विधानसभा अध्यक्षपद स्वत:कडे ठेवून काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. मात्र, ज्या काँग्रेस नेत्याला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल, त्याचं आताचं खातं पटोले यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ठाकरे सरकारमधील काँग्रेसच्या विद्यमान मंत्र्यालाच उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत काँग्रेसमधून बाळासाहेब थोरात यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. तसेच राज्यात सत्ता आणण्यात थोरात यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. शिवाय थोरात हे राज्यातील पक्षाचा चेहरा राहिला आहे. राज्यातील राजकारणावर त्यांची पकड आहे.
उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून काँग्रेसमध्ये कुणाच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.