शिवसेनेची प्रत्येक भूमिका ही आमची भूमिका असलीच पाहिजे असे काही नाही. आम्ही राज्यात सत्तेत एकत्र आहोत म्हणून शिवसेनेची ही भूमिका असेनच असे नाही. असे वक्तव्य कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे कॉंग्रेसची सेनेवर काही नाराजी आहे का? महाविकासआघाडीत फुट पडण्याची शक्यता आहे का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात ऊधान आले आहे.
भाजप स्वत:ला हिंदुत्वावादी म्हणवून घेते. मग हिंदुत्ववादी विचारवंत असणारे स्वातंत्र्यावीर विनायक दामोदर सावरकर यांना अद्यापर्यंत भारतरत्न का दिला नाही? असा सवाल ऊद्धव ठाकरेंनी अधिवेशनादरम्यान सभागृहात ऊपस्थित केला होता. या पार्श्वभूमिवरच नाना पटोले यांनी हे विधान केले आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा अशी मागणीसुद्धा केली आहे. भारतरत्न देण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. राज्य सरकारचा नाही असेसुद्धा नाना पटोले यावेळी म्हणाले.
सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा ही शिवसेनेची पूर्वीपासूनची मागणी आहे. शिवसेना आपल्या भूमीकेवर ठाम आहे. परंतू शिवसेनेची ही भूमिका कॉंग्रेसची भूमिका नाही. तरिदेखील सावरकरांचा आधार घेऊन भाजपने आमच्यावर नेहमिच टीका केली आहे. मग आता सत्तेत येऊन सहा वर्षाचा काळ लोटल्यानंतरसुद्धा भाजपने सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? या प्रश्नाचे ऊत्तर केंद्रातील सत्ताधार्यांनी जनतेस द्यावे. असेसुद्धा नाना पटोले यावेळी म्हणाले.