अंबानी यांच्या घरासमोरील ती स्कॉर्पिओ कार चोरीला गेलीच नव्हती ! एनआयएचा दावा

18

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर २५ फेबृवारीला स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत स्कॉर्पिओ कार आढळून आली होती. परंतू कारचे मालक मनसुख हिरेन यांनी १७ फेबृवारीलाच त्यांची स्कॉर्पिओ कार चोरी गेल्याचे त्यांच्या तक्रारीत म्हटले होते. सचिन वाझेच या चोरीच्या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र एनआयएने याबाबतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. ती स्कॉर्पिओकार चोरीच गेली नव्हती असा खुलासा एनआयएने केला आहे. या कारच्या चोरीचा तपास सचिन वाझे करत होते. एनअायएच्या या खुलास्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणींत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

स्कॉर्पिओ कारचे मालक आणि संशयास्पद मृत्यु झालेले मनसुख हिरेन यांनी १७ फेबृवारीला कार चोरी गेल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र १८ फेबृवारी ते २४ फेबृवारीदरम्यान हिरेन यांची स्कॉर्पिओ कार अनेकदा वाझेंच्या सोसायटीत बघण्यात आली आहे. ठाण्यातील साकेत सोसायटीत वाझे राहतात. सचिन वाझेंच्या पथकाने येथील सीसीटीव्हीचे डीव्हीआर ताब्यात घेतले होते. एनआयएने ते पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन यातील फेटेजवरुन हा खुलासा केला आहे.

दरम्यान वाझे यांच्या पथकाने साकेत सोसायटीतील डीव्हीअारच ताब्यात का घेतले? त्याचा पुरावे म्हणून ऊल्लेख का करण्यात आला नाही? एकंदरीतच वाझे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पुरावे नष्ट करण्ताचा प्रयत्न केला असल्याचेसुद्धा एनआयएने म्हटले आहे.

अंबानी यांच्या घरासमोर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारच्या प्रकरणी एनआयए तपास करीत आहे. एनआयएने तपासादरम्यान सचिन वाझे यांना अटक केली असून २५ मार्चपर्यंत ते एनआयएच्या ताब्यात असणार आहेत. एनआयएच्या तपासात रोज नवनिविन खुलासे होत आहेत. दरम्यान सचिन वाझे यांना पुन्हा पोलिसदलातून निलंबित केले आहे.