भारतामध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना लसीकरण मोहिमेंतर्गत देशातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस 13 फेब्रुवारीपासून दिला जाणार आहे. देशात 16 जानेवारी पासून लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता.
निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के पॉल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ज्यांना पहिला डोस देण्यात आला आहे त्यांनाच हा दुसरा डोस दिला जाईल असे पॉल यांनी सांगितले. आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केवळ पहिलाच डोस देण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. व्ही.के. पॉल यांनी दिली.
आतापर्यंत 41 लाखांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्यातील फक्त 0.18 टक्के म्हणजेच 8563 जणांमध्येच त्याचे साइड इफेक्ट्स दिसून आले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.
कोरोना लसीकरण मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोना योद्ध्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. त्यात कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रत्यक्ष युद्धपातळीवर लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात ज्येष्ठ नागरिक, तसंच सामान्य नागरिकांना लस दिली जाणार आहे.