नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरल्याचे सांगितले जात आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या हायकमांडने नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचे नाव निश्चित केले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे.
मंगळवारी दुपारी दिल्लीत राहुल गांधी पत्रकारपरिषद घेणार आहेत. यावेळी नाना पटोले यांच्या नावाची घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.