राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीनच आहे, असे राज्य सरकारने माहिती कार्यालयाद्वारे दिलेल्या प्रेसनोटद्वारे म्हटले असून त्यामुळे अनलॉकच्या विषयात सरकारी पातळीवरील निर्णयप्रक्रियेतील गदारोळ पुन्हा एकदा पुढे आला आहे.
राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतून अनलॉकबाबत माहिती जाहीर केली. पहिल्या टप्प्यात सरकारने काही जिल्ह्यांमधून निर्बंध हटविण्याबाबत निर्णय घेतले आहेत. ते लागू होती, असे नमूद करतेवेळी संबंधित जिल्हा प्रशासन त्याबाबत आदेश काढतील, असेही म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर सोशल मिडियातून, ईलेक्ट्रॉनिक मिडीयातून मंत्री महोदयांचे ते वक्तव्य, तपशील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर माहिती कार्यालयाने लगेचच यासबंधीचा प्रेसनोटद्वारे खुलासा केला.
जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने गुरुवारी रात्री प्रसारमाध्यमांना पाठविलेल्या प्रेसनोटमधून कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही.
ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत, असे नमूद केले आहे.