मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज ‘वर्षा’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवास्थानी बैठक पार पडली. मराठा समाजाच्या नियुक्त्यांबाबत तसेच एमपीएससीपासून सर्वच विषयांबाबत चर्चा झाली. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिल्याचे खासदार संभाजीराजे म्हणाले.
या बैठकीला खासदार संभाजीराजे, मराठा आरक्षणविषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आणि कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सरकार मराठा आरक्षणाचा विषय हाताळणाऱ्या ज्येष्ठ विधीज्ञानांशीही चर्चा करणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
राज्यसरकार त्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन या प्रश्नावर लवकर निर्णय घेईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीदरम्यान दिल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला सुपर न्युमररी म्हणजेच शिक्षण आणि नोकऱ्यात अधिक जागा देण्याबाबत तसेच नियुक्त्यांबाबतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी पूर्णपणे सकारात्मक आहेत. संध्याकाळी सव्वा सहा वाजता सुरू झालेली ही बैठक तब्बल तीन तास सुरू होती.