जागतिक मंदीतून सावरत असताना परत पुढे आलेल्या कोरोनाच्या भीषण संकटामुळे देशभरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.राज्यातील टोलची दरवाढ मागे घेत विविध माध्यमांतून होणारी वाहतूक उद्योगाची लूट थांबवावी, अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम. सैनी यांनी केली.
रस्त्यावरील असुविधा, पोलिसांकडून होणारी अनधिकृत लूट आणि पुन्हा टोल दरवाढ यामुळे वाहतूक व्यावसायिक देशोधडीला लागत आहेत. गुरुवारपासून राज्यातील विविध टोलमध्ये झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे वाहतूकदार आणखी अडचणीत सापडले आहेत.
वाहतूक व्यावसायिकांना दिलासा न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. संघटनेतर्फे याबाबतचे निवेदन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.