मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच; ‘ही’ दिग्गज नावं चर्चेत

21

मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदासाठी आता जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाच्या नियुक्तीला आता वेग आला आहे. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील तसेच मुंबईतील पक्ष संघटनेत बदल करण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदासाठी इच्छूकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदासाठी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत सिंह मनहास आणि कामगार नेते भाई जगताप, माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी या तिघांची नावं आघाडीवर आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीसाठी गुरुवारी दुपारी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ व महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यात सुमारे दीड तास  बैठक झाली.  या बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

येणाऱ्या काळात मुंबई महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत, या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. मुंबईचं अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते यावर मुंबई महानगरपालिकेची अनेक गणितं ठरणार आहेत.