भाजपचा वाढत असलेला प्रचार पाहता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्रं लिहून समर्थन मागितले आहे. भाजप विरोधी सर्व पक्षांच्या नेतृत्वाला त्यांनी प्रचारासाठी निमंत्रण पाठवली आहेत.
सोबतच ममता यांनी विधानसभा निवडणुकीचा हा टप्पा झाल्यानंतर भाजपाविरोधात रणनीती आखण्यासाठी बैठक करण्यासंबंधी या पत्रात सुचवले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही हे पत्र प्राप्त झालेले आहे.
शरद पवार यांचा १ ते ३ एप्रिलपर्यंत प. बंगालचा दौरा प्रस्तावित होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा नियोजित दौरा रद्द झाला. पण ममता बॅनर्जी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
पवार साहेबांची प्रकृती सुधारल्यास व शक्य झाल्यास निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ते प. बंगालला जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री मा. ना. नवाब मलिक यांनी दिली.