केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्पावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प शेतकरी आणि जवानांच्या फायद्याचा नसून केवळ उद्योगपतींच्या फायद्याचा असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.
सरकारचा अर्थसंकल्प हा सामान्य भारतीयांचा नसून केवळ एक टक्के लोकसंख्येसाठीचा अर्थसंकल्प असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. काही उद्योगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आल्याचा आरोपही गांधींनी केला आहे.
राहुल गांधी यांनी एक ट्वीट केलं असून त्यात ते म्हणाले की, “अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आली आहे. जवान आणि शेतकरी नाहीत तर मोदी सरकारसाठी केवळ तीन-चार उद्योगपती देव आहेत.” राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरुन केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली आहे. या आधी त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, “मोदी सरकारने देश आणि घर या दोन्हींचे बजेट बिघडवले आहे.”
दरम्यान, अर्थसंकल्प म्हणजे केवळ एक टक्के लोकांच्या भल्यासाठी आहे. मोदी सरकार देशाची संपत्ती त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या हातात देत आहेत. सामान्य लोकांच्या हातात पैसा द्यायला सरकार विसरलं असल्याचंही गाधींनी म्हटलं आहे