आगमी काळात येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधनी करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आणि भाजपसाठी ही प्रतिष्ठेची निवडणुक असणार आहे. मनसेनेसुद्धा यासाठी कंबर कसली असून मनसेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवरील बैठकांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजो युतीच्या चर्चा रंगत आहे. त्यामुळे मुंबई पालिका निवडणुकांसाठी मनसे भाजपाबरोबर जाणार का? या प्रश्नावर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी पाणी सोडले आहे. मनसे सर्वच्या सर्व २२७ ही जागा स्वतंत्र लढविणार असल्याचे त्यांनी सांगीतले. मुंबई येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
मुंबई महानगरपालिकेसाठी महाविकासआघाडी एकत्रित लढणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबई कॉंग्रेसमधील होणारे बदल बघता कॉंग्रेससुद्धा निवडणुकांसाठी चांगलीच तयारी करत असल्याचे बघायला मिळते. शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी भाजपसुद्धा निवडणुकीत जोमाने ऊतरणार आहे. या पार्श्वभूमिवरच मनसेतील काही बदल आणि राज ठाकरेंची केंद्र सरकारबाबत अचानक झालेली मवाळ भूमिका यावरुन भाजप मनसे युती होणार का अश्या चर्चा राजकीय वर्तूळात रंगत होत्या. “समान विचारधारेने कार्य करण्यास मनसे तयार असेल तर आम्ही युतीसाठी तयार आहोत” अशी भूमिका भाजपाकडून घेण्यात येत आहे. मात्र कुणाहीसोबत न जाता स्वतंत्र लढणार असल्याचा सुरु मनसेच्या बैठकांमधून येतो आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि मनसे यांच्यात युती होणार की नाही, याविषयी उलटसुलट सुरू चर्चा आहे. मात्र कोणाशीही युती न करता सर्वच्या सर्व २२७ जागा स्वतंत्रपणे लढवाव्यात, असा सूर पक्षाच्या बैठकांमधून उमटत आहे.
बैठकीबाबत सविस्तर भूमिका मांडतांना संदिप देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांना सुरुवात केली आहे. “आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये आम्ही विभागनिहाय परिस्थितीचा आढावा घेत आहोत. अमित ठाकरे स्वतः सगळ्या बैठकांना हजर असतात. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत असून तरुण कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी खूपच आकर्षण आहे. पालिकेच्या सर्वच्या सर्व २२७ जागांवर स्वतंत्रपणे लढावे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.” असे संदिप देशपांडे यावेळी म्हणाले. ” कार्यकर्त्यांची ही भावना राह साहेबांपर्यंत पोहचविण्याचे काम आम्ही करणार आहे. शेवटी किती जागा लढवायच्या, कुणाला टिकीटं द्यायची ई. सारख्या विविध विषयांवर राज साहेब स्वत: निर्णय घेतील जो पक्षाला मान्य असेल” असेसुद्धा देसपांडे यावेळी म्हणाले.
सध्या खीळखीळे झालेले मनसेचे संघटन निवडणुकांमुळे पुन्हा मजबुत करण्याची संधी पक्षाकडे आहे. त्यामुळे मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले आहे. अमित ठाकरे युवा चेहरा म्हणून समोर येत आहे. मनसेच्या झेंड्यात झालेला बदल, हिंदूत्वाचा विचार आणि मराठी माणुस हे निवडणुकीत मनसेला किती फायदा करुन देणारे ठरणार हे येणारा काळच सांगणार आहे.