प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी मंगळवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. बैठकीत संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आल्याचे भेटीनंतर पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेवून बाहेर आल्यानंतर पटोले प्रसारमाध्यमांना भेटीची माहिती देत होते. दरम्यान खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या वाहनातून १०, जनपथ समोरून जात होते. पटोले यांना बघताच त्यांनी कार थांबवून पटोले यांना भर रस्त्यात प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
दरम्यान पक्षाची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी भाजप सेलिब्रिटींचा वापर करीत असल्याचा घणाघात काँग्रेस चे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
देशवासियांना भाजपची देशभक्ती समजली आहे. देश संपवण्याची देशभक्ती भाजप ची आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन खऱ्या अर्थाने देशाला समजले आले आहे. भाजपने त्यामुळे आम्हाला देशभक्ती शिकवू नये, असा टोला त्यांनी लगावला.
अभिनेता सुनील शेट्टी तसेच भाजप नेत्याकडून करण्यात आलेले ट्विट यात साम्य आहे. अशात या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन राज्याच्या गृहमंत्र्यांना काँग्रेसकडून देण्यात आले आहे. पंरतु, सेलिब्रिटींनी त्यांच्या ‘फ्रेम’मध्येच राहावे, असा सल्ला त्यांनी दिला.