या कारणांमुळे होऊ शकतो अयोध्येती मंदिर निर्मीतस विलंब!

13

अयोध्येत भव्य राममंदिरनिर्मीतीसाठी संपूर्ण देशभर हिंदूत्ववादी संघटनांकडून राममंदिर निधी समर्पन अभियान राबविण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाने या वादग्रस्त प्रकरणावर निकाल दिला आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ५ अॉगस्ट २०२० रोजी मंदिराचे भूमिपुजन करण्यात आले. त्यानंतर राममंदिरनिर्मीतीच्या कार्यास सुरुवात झाली. मात्र   मंदिराचा पाया खोदताना काही तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. सर्व बाबींवर विचार करुन सल्लामसलत करुन मंदिराच्या पाया मजबूतीकरणाच्या कामास सुरुवात होणार आहे. परिणामी मंदिर पुर्णत्वासाठी २०२५ ऊजाडण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे.

मंदिराचा पाया बांधण्यासाठी मृदा चाचणीचे काम सुरू करण्यात आले आहे. पायाच्या खांबांना सुमारे ७०० टन वजन पेलावे लागणार, असे गृहीत धरून तेवढे वजन खांबावर ठेवले असता तो दोन सेंटिमीटरऐवजी चार सेंटिमीटर खोल गेला. शरयू तीरी मंदिर उभारणी होत असल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे तेथील मुरूम थोडा मऊ आहे. त्यामुळे काही अडचणी येत आहे. परिणामी मुंबई, रुरकी, गुवाहाटी, मद्रास या आयआयटी, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट (रुरकी), नॅशनल जिओग्राफिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट (हैदराबाद) अशा दहा नामांकित संस्थांमधील तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यात येत आहे. त्यांनी पाया उभारणीत तांत्रिक दृष्टीने काही बदल सुचविले असून आता चुनखडी, कठीण दगड आणि सिमेंट काँक्रीट अशा तीन घटकांचा वापर करून पाया भक्कम करण्यात येणार आहे. सुचवलेल्या बदलांमुळे बांधकामास विलंब होणार असल्याची माहिती अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुपकुमार झा यांनी दिली.

मंदिर उभारणीचे काम सुरू असतानाच अयोध्येतील पायाभूत सुविधांचा मोठय़ा प्रमाणावर विकास करण्यात येणार आहे. सध्या दररोज सरासरी १०-१५ हजार रामभक्त मंदिरात दर्शनासाठी याठिकाणी येतात. सणासुदीच्या काळात या आकड्यात प्रचंड वाढ होते. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी विकास आराखडासुद्धा बनविण्यात आला आहे. येणार्‍या काही दिवसांतच त्यावरसुद्धा काम सुरु होणार आहे. यामध्ये भाविकांसाठीच्या पायाभूत सुविधा, भक्तनिवास, अयोध्या रेल्वे स्थानक विस्तारीकरण, रेल्वेमार्ग वाढविणे,  रस्ते रुंदीकरण, विमानतळ उभारणी ही कामेही असणार आहेत.