थर्टी फर्स्टची पार्टी

15

आज सकाळपासुन मदन खूपच घाई गडबडीत दिसत होता. रोज उशिरा उठणारा मदन आज सकाळी लवकरच उठला, गाडीला किक मारली आणि बाहेर गेला. हो कारण ही तसेच होते, आज थर्टी फर्स्ट, अर्थात डिसेंबर महिन्यातील शेवटची तारीख. युवकांना या तारखेचे तसे खूप आकर्षण असते आणि डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून त्यांची थर्टी फर्स्टची तयारी सुरू असते. मदनचे मित्रमंडळी म्हणजे अख्खी एक क्रिकेटची टीम. गल्लीतले जवळपास दहा ते अकरा त्याचे मित्र मिळून थर्टी फर्स्टची जोरदार तयारी चालू केली होती. प्रत्येकांकडे कामाची जबाबदारी दिली होती आणि मदनकडे मटण आणण्याची जबाबदारी दिली होती म्हणून तो आज सकाळी सकाळी उठून घराबाहेर पडला होता. शरदकडे मटणसाठी लागणाऱ्या सर्व मसाला आणण्याची जबाबदारी होती. विनयकडे मटण शिजविण्यासाठी लागणाऱ्या सर्व भांडीकुंडीची जबाबदारी दिली होती. अडीपडीला कामाला येणारे राम-लक्ष्मण ही जोडी माल आणण्यासाठी राखीव ठेवण्यात आले होते. पूर्ण गल्लीत आज मदन आणि त्यांच्या मित्रमंडळीची  नुसती धावपळ दिसून येत होती. वर्षातून एकच दिवस तर येतो ज्यादिवशी आई-बाबा देखील या पोरांना पार्टी करायला काही म्हणत नाहीत. पण आई-बाबा दारू पिण्यासाठी परवानगी देत नाहीत मात्र मित्रमंडळी मधला एखादा राहतो हुशार तो हे सारं घडवून आणतो आणि मुलं वाईट मार्गाला लागतात. त्यापैकीच एक होता तो म्हणजे विजय. त्याला सर्व वाईट सवयी त्यामुळे तो या पार्टीत दारू आणण्यांचा डाव रचला. हो-नाही करता करता माल आणण्याची जबाबदारी राम-लक्ष्मणकडे देण्यात आली. ते देखील भीत भीत वाईन मार्टवर गेले. आज वाईन मार्टवर खूप गर्दी दिसत होती. रेशनच्या दुकानासमोर जशी रांग दिसते तशी आज दारूच्या दुकानासमोर रांग लागली होती. कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी आपल्या तोंडावर रुमाल बांधली होती. त्यांच्या आजूबाजूला गल्लीतले बरीच मंडळी रांगेत थांबलेली दिसत होती. आज त्यांना हे ही कळून चुकले की गल्लीत कोण कोण चोरी चोरी चुपके चुपके दारू पितात. रोज चांगुलपणावर भाषण झाडणारा सदानंद काका देखील त्यांना रांगेत दिसल्यावर तर त्यांनी खाली मुंडी घातली तर काउंटर येईपर्यंत वर तोंड केलेच नाहीत. अखेर दोघे काउंटर वर पोहोचले तोपर्यंत यांना जी दारू हवी होती ती संपली होती. म्हणून जरासे महागडी दारू खरेदी करावी लागली. फोन करून विचारण्याची कुठली सोय ? जितकी दारू येते तितकी दारू खरेदी केली, बाटल्या पिशवीत कोंबल्या आणि आपल्या गल्लीत जाण्यासाठी निघाले. गाडीच्या मागे लक्ष्मण पिशवीतल्या बाटल्या धरून बसला होता. हा माल ठेवायचा कुठं हा फार मोठा प्रश्न होता. सर्वाना मदनचे घर अगदी सेफ वाटले. कारण त्याच्या घरात तो आपल्या आईसोबत एकटाच राहत होता. म्हणजे घरात दोनच व्यक्ती, तेथे दारू लपवून ठेवायला त्यांना काही धोका नव्हता. म्हणून त्यांनी मदनच्या घरात माल आणून एका कणगीत लपवून ठेवले. विनयने मटण शिजविण्यासाठी लागणारे सर्व भांडीकुंडी एकत्र केली आणि त्याच्याच घरात भाजी शिजवायची होती. त्याच्या घराच्या पाठीमागे मोकळं अंगण होते आणि आजूबाजूला पडलेली खूप लाकडं देखील होती. सर्व मित्र मिळून थर्टी फर्स्ट साजरा करत आहेत, मुलं गुणी आहेत, बाहेर कुठं जात नाहीत असे समजून त्यांचे पालक देखील त्यांना या पार्टीत सहकार्य करीत होते. शरदने सर्व मसाला आणला होता. काही मित्र येणे बाकी होते. वर्षातील शेवटच्या दिवसाचा सूर्य अस्ताला जात होता. कधी नव्हे ते सारेजण अस्तास जाणाऱ्या सूर्याकडे पाहत होते. तो अस्ताला गेला की इकडे कामाला सुरुवात होणार होती. अखेर अंधार पडायला सुरुवात झाली. चूल पेटविण्यात आलं. विनय मटणची भाजी करण्यात खूपच एक्स्पर्ट होता. त्याने चुलीवर पातेलं ठेवलं. त्यात तेल टाकून गरम होण्याची वाट पाहू लागला. तेल गरम झाल्याची टेस्ट त्याने तेलात जिरे मोहरी टाकून केली. त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकली मग त्यात मटणाचे पीस टाकून शिजवायला ठेवलं. लाकडं वाळलेली होती त्यामुळे व्यवस्थित जाळ लागत होतं. मीठ-मिरची आणि मसाला टाकून भाजी शिजण्याचे सर्वजण वाट पाहू लागले. हिवाळ्याचे दिवस असल्याने हवेत गारवा होता, थंडी सुटली होती. मदन, विनय, शरद, राम, लक्ष्मण त्यांचे मित्र सारेचजण फक्त विजयला सोडून तेथेच चुलीभोवती भाजीचा खमंग वास घेत आणि शेकत बसले होते. हळूहळू दाट अंधार पडू लागला. घरातील पालक मंडळी आपापले जेवण आटोपून पेंगु लागली होती. सर्व मित्रांनी तोच प्लॅन केला होता. सारे मंडळी झोपली की आपण सर्व थोडा थोडा माल घेऊ आणि जेवण करून थर्टी फर्स्ट साजरा करू. म्हणजे कोणाला काही कळणारच नाही. त्यांच्या प्लॅननुसार सारे झोपी गेले होते. मदनच्या घरी जाऊन माल आणणे बाकी होते. त्यासाठी मदनच्या घरी त्याच्यासोबत राम-लक्ष्मण गेले. त्यांनी घरात कणगीत पिशवी लपवून ठेवली होती. तिथे जाऊन कणगीत पिशवी घेण्यासाठी हात घालतात पण हाताला काहीच लागत नाही. पिशवी गेली कुठं ? असा प्रश्न त्यांना पडतो. मदनच्या आईला या पिशवी विषयी काही माहितीच नाही तर विचारावं कसं ? म्हणून ते काहीच न विचारता तेथून विनयच्या घरी येतात. मदनच्या घरी ठेवलेला माल तिथं दिसत नाही. कुठं गायब झालं ? काही कळत नाही. म्हणून सारेच मित्र काळजीत पडतात. माल मिळाले नसल्याने साऱ्यांचे चेहरे पडतात. रात्रीचे अकरा वाजल्यावर त्यांचा मित्र विजय तर्रर्र होऊन त्यांच्याकडे येतो. त्याला नीट चालता देखील येत नव्हते, एवढं दारू पिऊन तो मित्रांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्नांत जागेवर कोसळतो. सारे मित्र मिळून त्याला उठवितात आणि एका बाजूला असलेल्या बाजावर झोपू घालतात. दारू पिल्यानंतरची विजयची अवस्था पाहून सारेच मित्र एकमेकांना म्हणतात. बरे झाले आज आपणाला माल मिळालं नाही ते, नाही तर आपली अवस्था देखील या विजय सारखीच झाली असती. दारू हे केव्हाही वाईटच असते. आज थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला आपण सारेजण जीवनात कधीही दारू न पिण्याची शपथ घेऊ या असे मदनने साऱ्या मित्रांना आवाहन केले. मदनच्या आवाहनाला सर्व मित्रांनी प्रतिसाद दिला आणि जीवनात कधीही दारू न पिण्याची शपथ देऊन पोटभर मटणाचे जेवण केले. एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि रामाच्या घराजवळ विजय राहत असल्याने तो त्याला घेऊन गेला. बाकीचे आपापल्या घरी झोपायला गेले. मदनची आई लपूनछपून हे सारे पाहत होती. मदनच्या मित्रांना कोणालाच हा माल मिळू नये म्हणून मदनच्या आईनेच कणगीत लपवलेले दारूची पिशवी काढून इतरत्र ठेवली होती. कारण दारू पिण्याची सुरुवात अश्याच छोट्या छोट्या प्रसंगातून आणि मित्रांच्या सोबतीने होत असते. अगदी सुरुवातीला दारू पितांना खूप गंमत वाटते पण हेच दारू पुढे जीवनाचा नाश करते. मदनच्या वडीलांचे या दारूमुळेच मृत्यू झाला होता. पुन्हा आपला मुलगा व त्याचे मित्र याच वाटेवर जाऊ नये म्हणून तिने ते कणगीत लपवलेली पिशवी बाजूला काढली होती.
नवीन वर्ष उजाडला. मदनच्या आईने त्याच्या सर्व मित्रांना आपल्या घरी चहा-फराळासाठी बोलाविले होते. त्याचे सर्वच मित्र सकाळी सकाळी छान तयार होऊन आले होते. फक्त विजय आला नव्हता. त्याला रात्रीची दारू जास्त झाली होती. मदनच्या आईने विजयला आणण्यासाठी राम-लक्ष्मणला पाठविले. तिला माहीत होते. विजयला फक्त हे दोघेच आणू शकतात. अखेर विजय देखील आला. सारेजण मदनच्या घरात वर्तुळात बसले होते. साऱ्यांच्या गप्पा चालल्या होत्या. विनयने भाजी खूप चांगली केली म्हणून स्तुती करत होते. तेवढ्यात मदनच्या आईने सर्वांच्या पुढे ती रात्रीची दारूची पिशवी काढून ठेवली. सारेचजण बुचकळ्यात पडले. आईनेच पिशवीची जागा बदलली होती, हे साऱ्यांच्या लक्षात आले होते. आईच्या या कृतीने सारेच मित्र खजील झाले. त्यांनी मदनच्या आईचे पाय धरले आणि आयुष्यात कधीच बाटलीला हात लावणार नसल्याची शपथ देखील घेतली. त्यात विजयचा देखील समावेश होता. नव्या वर्षाच्या पहाटे विजयने दारूला स्पर्श न करण्याची शपथ घेतली. आईने देखील सर्वाना बंधनात टाकली की, जो कुणी दारूला स्पर्श करेल त्याला तुमच्या मैत्रीपासून दूर राहावे लागेल. सर्वांनी एकाच्या हातावर एक हात ठेवून शपथा घेतल्या. आज मदनची आई जाऊन दहा वर्षे संपली. कामाच्या निमित्ताने सारे मित्र इकडे तिकडे विखरून गेलेत तरी ही थर्टी फर्स्ट आली की ती सायंकाळ आणि मदनची आई आज ही साऱ्या मित्रांना आठवल्याशिवाय राहत नाही.

  • नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769