भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे दशक महत्वपूर्ण आहे: नरेंद्र मोदी

11

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला संसदेत सादर केला जाणार असून यावेळी हा अर्थसंकल्प प्रथमच कागदविरहीत स्वरूपात सादर करण्यात येणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. या प्रसंगी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासाठी निर्माण केलेल्या एका मोबाइल ऍपचे उद्घाटन केले आहे.

भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे दशक महत्वपूर्ण आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन भारताचे उज्ज्वल भविष्य निश्चित करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचले. यावेळी ते बोलत होते.

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याची घोषणा विरोधकांनी केली आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

वादग्रस्त कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि इतर मुद्‌द्‌यांवरून मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत.अधिवेशनात केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. सर्वांचे समाधान करणारा अर्थसंकल्प मांडण्याचे मोठेच आव्हान सरकारपुढे आहे. करोना संकटामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन झाले नाही. मात्र, त्याआधी पावसाळी अधिवेशन घेण्यात आले.

अर्थसंकल्पाशी संबधित सर्व घटक या ऍपमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अर्थमंत्र्यांचे 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर मोबाइल ऍपवर याबाबतची सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.