राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर नाहक आरोप करण्यात आले असून स्वतः महेबूब शेख यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. मात्र भाजप राजकीय फायदा उठवण्यासाठी षडयंत्र करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
महेबूब शेख यांच्याबाबत औरंगाबादेत तक्रार दाखल झाल्यानंतर लगेचच संबंधित अधिकाऱ्यांशी महेबुब शेख यांनी संपर्क केला. तसेच आपण सर्वप्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत असे कळविले. काही तथ्य आढळल्यास मला शिक्षा करा अशीदेखील विनंती तपास अधिकाऱ्यांकडे केल्याचे महेश तपासे यांनी सांगितले.
भाजपाने राजकीय फायदा उठवण्यासाठी कालपासून महेबूब शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अल्पसंख्यांक समाजात राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून नवीन नेतृत्व पुढे येत आहे हे काही विरोधी विचाराच्या पक्षाच्या मंडळींना बघवत नाही आणि त्यातून अशा खोट्या आरोपांच्या घटना समोर येत असाव्यात असे महेश तपासे म्हणाले.