महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत अॅड.रावसाहेब शिंदे यांचा स्मृतिदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील आणि कृषितज्ज्ञ विलास शिंदे यांना अॅड.रावसाहेब शिंदे पुरस्काराने गौरवण्यात आले.
अपुरा निधी, कमी मनुष्यबळ, रिक्त जागा या आव्हानांचा सामना करत आरोग्य सेवा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ता गाजवण्यासाठी नाही, गांजलेलल्यासाठी असते. प्रत्येकाला संतुष्ट करता आले नाही तरी चांगल्या हेतूने सेवा करता येते. आरोग्य सेवा पोहोचण्या योग्य, परवडणारी आणि स्वीकारार्ह असली पाहिजे. कोरोना काळ हा नफेखोरीचा कालावधी नाही.
सामान्य लोक लुबाडले जाऊ नयेत, यासाठी नफेखोरांवर लगाम ठेवण्याचे काम शासनाचे असते. जनहिताचा रथ शासनाला अधिक गतीने पुढे घेऊन जायचा आहे.असे राजेश टोपे म्हणाले.
आजवरचे सर्वात आदर्श आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपे यांचा सन्मान केला पाहिजे. समर्पण वृत्तीने त्यांनी अहोरात्र काम केले. राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी ४ ऐवजी ८ टक्के तरतूद करावी, अशी मी शासनाला विनंती करतो. कोणत्या विषाणूचे संकट कधी उभे ठाकेल, हे सांगता येत नाही. त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम हवी.
- अरुण गुजराथी, माजी अध्यक्ष, विधानसभा
प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि डॉ. राजीव रावसाहेब शिंदे उपस्थित होते. सचिन ईटकर यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उद्धव कानडे यांची ‘समतेचा ध्वज’ या ग्रंथाचे प्रकाशन पार पडले.