‘दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, त्यांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत’

24

“अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.

अजितदादा पवार पुढे म्हणाले की,” भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती.

टेलिव्हिजनच्या पडद्यावर चमकण्यासाठी हपापलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी बिनबुडाचे आरोप करून राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करू नये. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्याला कमकुवत करण्याचं पाप करू नये.”

“दररोज सकाळी सात वाजल्यापासून मी सर्वांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी उपलब्ध असतो. भाजपचेही कितीतरी आमदार, आजी-माजी नेते दररोज भेट घेतात. दिवसभर फोन करतात. गेली दीड वर्षे हा कार्यक्रम अखंड सुरू आहे. लोकांच्या सतत संपर्कात राहणारा मी कार्यकर्ता आहे. मंत्रालयात आणि राज्यातील जनतेत मी कायम उपस्थित असताना ‘अजित पवार नेटवर्कबाहेर’चा हा आरोप करणाऱ्यांचा हेतू व मेंदू तपासून घेण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.