आरोपींना वाचवण्यासाठी भाजपच्या ‘या’ आमदाराचा थेट पोलिसाला फोन

38

पवईच्या हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एका ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीवरुन येत धडक दिली होती. नियमांचं उल्लंघन करत हे भाजपचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करत होते. यावेळी घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे दाखल झाले.त्यावेळी कॉन्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. 

आरोपी हे आमदार राम कदम यांचे कार्यकर्ते असून त्यांना वाचविण्यासाठी राम कदम यांनी मारहाण झालेल्या पोलिसाला फोन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.राम कदम आणि खैरमोडे यांच्यात झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे.

“तुम्हाला झालेल्या मारहाणीचं मी समर्थन करत नाही. पण मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि त्या तिघांच्या भविष्याचा विचार करा. त्या तिघांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांचं लग्नही झालेलं नाही”, असं सांगत राम कदम यांनी खैरमोडे यांच्याकडे तक्रार मागे घेण्याची मागणी केली.

कॉन्स्टेबल खैरमोडे यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिमेचा प्रश्न असून असं करणं योग्य ठरणार नाही, असं ठामपणे सांगून राम कदम यांच्या मागणीला स्पष्ट नकार दिला.पोलिसाला मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी फोन करण्याच्या राम कदम यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.