वर्षभरात देशातील सर्व टोलनाके हटवणार; ‘या’ पद्धतीनं वसूल करणार टोल : नितीन गडकरी

21

देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत महत्वाची घोषणा केली आहे. येणाऱ्या वर्षात सगळे टोलनाके हटवण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. टोल ऐवजी जीपिएस यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. लोकं रस्तेप्रवास जेव्हढा करतील, तेव्हढाच त्यांना टोल द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम सुरु असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

टोलनाक्यांवर मलई खाण्यासाठी छोटे छोटे टोल उभारण्यात आल्याचं सांगत त्यांनी मागच्या सरकारवर निशाणा साधला. शहरांच्या सीमांवर टोल असणे चुकीचं असल्याचंही ते म्हणाले. बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी टोलचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं.

जर आम्ही टोलनाके बंद केले तर रस्ते बनवणाऱ्या कंपन्या आमच्याकडे भरपाई मागतील. मात्र सरकारने पुढील वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्याची योजना केली आहे” असे नितीन गडकरी म्हणाले.

सध्या सरकार अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, जिथे तुम्ही हायवेवर प्रवेश करताच, जीपीएसच्या मदतीने तुमचा फोटो काढला जाईल. जिथून तुम्ही हायवे सोडाल, तिथेही फोटो घेतला जाईल. म्हणजे तुम्ही जेव्हढा हायवेचा प्रवास केला किंवा जेव्हढा रस्ता वापरला तेव्हढाच टोल तुम्हाला द्यावा लागेल, असं गडकरी म्हणाले आहेत.