दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गावाला आणि पुण्याला निघालेल्या मुंबईकरांची गर्दी वाढली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा 2 किमी पर्यंत गेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही वाहनं टोल न घेता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्गावर कारची संख्या वाढली असल्यामुळे हि वाहतूक कोंडी झाली होती.
सोमवारी लक्ष्मीपूजन पार पडलं आणि उद्या भाऊबीज असल्यामुळे ही गर्दी वाढली आहे. खालापूर टोल नाक्यावरून पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या टोल न घेता सोडल्या गेल्या त्यांनतर वाहतूक कोंडी थोड्या प्रमाणात आवाक्यात आली. मुंबई-पुणे एक्सप्रेस वर नेहमी हजारो प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे खालापूर नाक्यावर गर्दी नेहमीच असते. मुबंई-पुणे एक्सप्रेस वे च्या टोल दरात एप्रिलमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे कार किंवा जीप साठी 230 ऐवजी 270 रुपये मोजावे लागत आहेत. तर मिनी बसला 355 ऐवजी 420 रुपये द्यावे लागतात. सर्व प्रकारच्या वाहनांचे टोल दर हे 40 ते 120 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत.