शिर्डीत भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी येऊ नये यासाठी सर्वच जण प्रयत्न करत होते. ब्राह्मण महासंघाने त्यांना शेंदूर फासण्याचा इशारा दिला होता. देसाई यांना शिर्डीत जाण्यास मनाई केलेली असतानाही त्यांनी तेथे जाण्याचा निर्धार केला. त्यामुळे नगर आणि पुणे हद्दीवर असलेल्या सुपा टोलनाक्यावर पोलिसांनी ही कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने स्थानिक प्रशासनाने देसाई यांना तिथे जाण्यास मनाई आदेश दिला होता.
देसाई यांनी यापूर्वी शनिशिंगणापूर देवस्थान व इंदोरीकर महाराज यांच्या प्रकरणाबाबतही आंदोलन केले होतं. त्यावेळीही देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.नगरबाबत त्यांचे हे तिसरे आंदोलन होते. मला माझ्या हक्कापासून रोखल्याचा देसाई यांचा आरोप आहे.
पोलिसांनी सुपा टोलनाक्याजवळ बंदोबस्त तैनात केला होता. त्यांना पोलिसांनी चर्चेसाठी खाली बोलावलं. परंतु त्या आल्या नाहीत. त्यामुळे महिला पोलिसांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यांनी पोलिसांसोबत झटापट करण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी दहा ते बारा महिला व पाच ते सहा पुरूष कार्यकर्त्यांना ताब्यात घेत सुपा पोलिस ठाण्यात आणले.देसाई यांना ताब्यात घेतल्याचे समजताच शिर्डीत फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.