भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर तोफ डागली आहे. ठाकरे सरकार संपत्ती लपवतंय, तर धनंजय मुंडे संतती लपवतायत तर सेना आमदार प्रताप सरनाईक अनधिकृत बांधकामात व्यस्त आहेत, अशी जहरी टीका किरीट सोमय्या यांनी केली.
सेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ठाणे महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर भाजपने आज आंदोलन केले. या आंदोलनात माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे हेही सहभागी झाले होते.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात पोलीस कारवाई करा आणि विहंग गार्डन इमारत प्रकरणी त्यांच्याकडून 11 कोटी दंड आहे तो वसूल करा, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
ठाकरे सरकारमधील मंत्री संपत्ती लपवतात. त्यातले एक मंत्री म्हणजे धनंजय मुंडे संतती लपवतात, महाराष्ट्रात हे चाललंय काय?, असा सवाल करताना सोमय्या यांनी आक्रमक होत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.