पुरातन मंदिराची मोठी हानी महाराष्ट्र झाल्याचं पाहायला मिळतं. आता महाराष्ट्र सरकार याच पुरातन मंदिरांचे संवर्धन करणार आहे. प्राचीन मंदिरे हा राज्याचा सांस्कृतिक वारसा असून हे वैभव जपण्याच्या दृष्टीने या मंदिरांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. प्राचीन मंदिरांचा विकास झाल्यास, प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन पुन्हा एकदा होईल अशी आशा भाविकांना आहे.
पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. श्री.ठाकरे म्हणाले, मंदिरांचे पावित्र्य, स्वच्छता यासोबतच येणाऱ्या भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल.
टप्प्या-टप्प्याने प्राचीन मंदिरांचा विकास करण्यात येणार असून त्यात कोणत्या मंदिरांचा समावेश करायचा याबाबत सभागृहाच्या सदस्यांनी सूचना कराव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.