नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलक मागच्या दोन महिन्यापासून दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. तसेच आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी निघणार्यांना दाबण्यासाठी ठिक-ठिकाणी रस्त्यात खिळे रोवण्यात आले आहेत. तसेच आंदोलन परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आलेल्या आहेत.
प्रसिद्ध पॉप स्टार रिहानाच्या ट्विटनंतर मोदी सरकारच्या समर्थनार्थ अनेक सेलिब्रेटी आणि क्रिकेटपटू देखील उतरले. अनेकांनी रिहाना आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गवर तर ट्विट करण्यासाठी पैसे घेतल्याचा देखील आरोप केला. मात्र आता थेट संयुक्त राष्ट्राच्या मानवी अधिकार संघटनेने ट्विट करत शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे.
त्यानंतर आता UN Human Rights ने शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट करत सल्ला दिला आहे. UN Human Rights ने ट्विट केले की, आम्ही भारतातील अधिकारी व आंदोलकांना सांगू इच्छितो की, शेतकरी आंदोलनादरम्यान जास्तीत जास्त संयम पाळावा. अभिव्यक्ती अधिकार शांततापूर्ण मार्गाने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं सुरक्षित राखले जावेत. या मुद्द्यावर योग्य तोडगा काढणं सर्वांसाठी महत्त्वाचं झालं आहे. दरम्यान, कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी आक्रमक झाले असून, शेतकऱ्यांनी आज देशभरात चक्का जाम करण्याची घोषणा केली आहे.