पक्षाच्या विविध कार्यक्रम आणि बैठकीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी आणि रविवारी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या भाजपधार्जिण्या सदस्यांना सभेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सभेसाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, गोविंद कारजोळ यांच्यासह वीसहून अधिक मंत्री उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा क्रीडांगणावर दुपारी चारला भारतीय जनता पक्षाच्या जनसेवक समारोप मेळाव्यात ते सहभागी होणार आहेत. या मेळाव्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा क्रीडांगणावर सायंकाळी 4 वाजता सभा होत असून, यासाठी तीन जिल्ह्यातील सुमारे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या बॅनर, कटआऊटस् आणि भाजपच्या झेंड्यांनी शहर व्यापून टाकले आहे.
दरम्यान, त्यांच्या बेळगाव दौऱ्यातील कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. याआधी मेळाव्यानंतर ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या निवासस्थानी भेट देणार होते. मात्र, आता ते मेळाव्याआधी दुपारी साडेतीनला दिवंगत अंगडी यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. मेळाव्यासाठी येणार्या सर्वासाठी भाजपकडून भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे लाखभर लोकांची भोजन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आ. संजय पाटील यांनी दिली. ही व्यवस्था मैदानापुढील हेस्कॉमच्या आवारात करण्यात आली आहे.