अण्णांची मनधरणी करायला आज ‘हा’ केंद्रीय मंत्री राळेगणसिद्धित; अण्णा उपोषणावर ठाम

15


शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करीत असणार्‍या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे मैदानात उतरले आहेत. येत्या ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपासून अण्णा हजारे या उपोषणाला राळेगणसिद्धी येथून सुरुवात करणार आहेत.

याआधी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर याच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीचा एक ड्राफ्टही अण्णांना देण्यात आला. तरीही अण्णांची समजूत निघालेली नाही. अजूनही अण्णा उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे भाजपचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

त्यामुळे आता अण्णांचे उपोषण थांबवण्यासाठी दिल्लीतून केंद्रीय कृषि राज्य मंत्री कैलास चौधरी आज राळेगणसिद्धीत येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे केंद्रीय कृषी राज्यमंत्री चौधरी अण्णांचे मतपरिवर्तन करू शकतात का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

अण्णा हजारे यांची समजूत काढण्यासाठी आत्तापर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे अण्णा हजारे यांच्या भेटीला गेले होते. महाजन यांनी अण्णांची भेट घेतल्यानंतर देखील अण्णांचं मन वळवण्यात ते यशस्वी ठरले नाहीत.