संयुक्त राष्ट्राचा ऐतिहासिक निर्णय! ड्रग्जच्या यादीतून भांगेला हटवले; २७ देशांचा पाठिंबा

11

संयुक्‍त राष्‍ट्र संघात झालेल्या ऐतिहासिक मतदानानंतर भांगेला अखेर औषधाच्या रुपात मान्यता देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या  विशेषज्ञांच्या अर्जानंतर संयुक्‍त राष्‍ट्राने हा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्राच्या मादक पदार्थ आयोगानेही भांगेला हेरॉईन सारख्या ड्रग्जच्या यादीतून हटवलं आहे. या यादीमध्ये अत्यंत घातक अशा ड्रग्जचा समावेश करण्यात येतो, ज्या ड्रग्समुळे माणसांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं आणि ज्याचं वैद्यकीय फायदे खूप कमी आहेत. आता या यादीतून गांज्याचं नाव हटविण्यात आलं आहे. यूएनच्या कायद्यानुसार भांगदेखील आता मेडिकल व्यक्तीरिक्त इतर वापरासाठी एक प्रतिबंधित ड्रग मानलं जाईल.

प्रतिबंधित मादक पदार्थांच्या यादीतून भांगेचं नाव काढण्यासाठी संयुक्त राष्ट्राने मतदान केलं होतं. या मतदानात २७ देशांनी सकारात्मक आणि २५ देशांनी विरोधात मतदान केलं आहे. या ऐतिहासिक मतदानादरम्यान अमेरिका आणि ब्रिटेनने या बदलासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र भारत, पाकिस्तान, नायजेरिया आणि रशियाने या बदलाला विरोध केला आहे. यूएनच्या या निर्णयानंतर भांगेपासून तयार केलेल्या औषधांच्या वापरात वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय भांगेबाबत सायंटिफिक रिसर्चबाबतही वाढ होण्याची शक्यता आहे. यूएनच्या या निर्णयानंतर अनेक देशांत भांग आणि गांजा वापराबाबत पॉलिसीमध्ये बदल करण्यात येऊ शकते.