नर्सिंग संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावीत:डॉ.निलम गोऱ्हे

11

कोरोना कालावधीत साथी संस्थेने कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिका आणि कर्मचारी यांच्या अनुभवावर सर्वेक्षण केले. याबाबत पहिल्यांदाच नर्सेससाठी वेबिनार आयोजित करण्यात आला होता. वेबिनारच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे होत्या. त्यावेळी त्यांनी नर्सिंग संवर्गातील वरिष्ठ स्थरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत अशी सूचना दिली आहे.

साथी संस्थेने नर्सेसच्या अनुभवावर जे सर्वेक्षण केले आहे ते शासनापर्यंत पोहोचवले जाईल. त्यावर करावयाच्या उपाययोजनांवर भर दिला जाईल. हिवाळी अधिवेशानंतर यासंदर्भात बैठक घेण्यात यावी. क्लिनिकल एस्टेबलिशमेन्ट ऍक्ट आवश्यक असून त्याबाबतीत अधिक अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी. अश्या सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी राजेश टोपे म्हणाले नर्सेसच्या रिक्त जागा होत्या त्या तातडीने भरल्या जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागातील १७ हजार रिक्त पदांपैकी ५० टक्के रिक्त पदे भरण्याची अनुमती दिली आहे. तसेच यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, संचालक डॉ.अर्चना पाटील,डॉ. अभय शुक्ला, डॉ. श्वेता मराठे, नर्सिंग संघटनेच्या प्रा. प्रवीण महाडकर, डॉ.स्मिता राणे उपस्थित होत्या.