‘केंद्रातील सरकारच्या ढिसाळ कामगिरीमुळे लसीकरणाचे नियोजन बिघडले’ : राष्ट्रवादी

6

केंद्र सरकारच्या ढिसाळ कामगिरीमुळे लसीकरणाचे नियोजन बिघडले आहे. कोरोना लशीचा पहिला डोस घेतलेल्या साडे चार लाख लोकांचा दुसरा डोस अजून बाकी आहे. लस पुरवठा होत नसल्यामुळे ठिकठिकाणी लसीकरण केंद्रावर लोक गर्दी करत आहेत.

जबाबदारी स्वीकारल्यानंतर जर ती पार पाडण्याची क्षमता आणि नियोजन नसेल तर मग जाहिरातबाजी करुन निर्णय का जाहीर केले जात आहेत? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

आज साडे चार लाख लोकांना दुसरा डोस मिळत नाही. १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी लसच उपलब्ध नाही. तरीही एकामागून एक निर्णय जाहीर करण्याची घाई केंद्र सरकारला लागली आहे. यापेक्षा अधिक ढिसाळ कारभार असू शकत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.

यावर उपाय शोधण्यासाठी तात्काळ सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली गेली पाहिजे. तसेच यावर मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय टास्क फोर्सची स्थापना करुन त्यासाठी एक नेता निवडला गेला पाहिजे, अशी मागणी सुद्धा नवाब मलिक यांनी केली.