राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल महाराष्ट्र टप्पेनिहाय अनलॉक करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून निर्णय झाला नसून, प्रस्ताव विचाराधीन असल्याचे म्हटले गेले. त्यानंतर राज्यात गोंधळ ऊडाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
परिणामी विजय वडेट्टीवार यांनी त्यावर लगेच स्पष्टीकरण देत अनलॉकबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे म्हणत हात वर केले होते. मात्र आज त्यांनी पुन्हा अनलॉकबाबत वक्तव्य केले असून, त्यावर स्पष्टीकरणसुद्धा दिलं आहे.
महाराष्ट्र लॉकडाऊनमधून कसा बाहेर पडणार याचा मसुदा महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तयार केला असून तो मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन गाईडलाईन्स जारी केल्या जातील. आज दुपारपर्यंत याबाबत अधिसुचना निघेल असेसुद्धा ते म्हणाले.
आज नागपुरमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत होते. काल त्यांनी अनलॉकबाबत जाहीर केलेला निर्णय आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलले स्पष्टीकरण यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. व्यापारीवर्ग संभ्रामवस्थेत होता. आज त्यांनी पुन्हा याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.