गायीच्या शेणापासून तयार केले “वैदिक पेंट”, नितीन गडकरींनी केली घोषणा

30

भारत सरकारकडून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नेहमी विविध उपक्रम राबवले जातात. याच दरम्यान आता गायीच्या गोबरपासून बनवलेल्या ‘वेदिक पेंट’चा देखील समावेश होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंबंधीची माहिती दिली. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून वैदिक पेंटची निर्मिती केली जाणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देऊ शकणाऱ्या वैदिक पेंट किंवा वैदिक रंगाविषयी माहिती देताना या रंगांच्या डब्यांचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यांनी गुरुवारी सांगितले की, शेणापासून बनविलेले ‘वैदिक पेंट’ लवकरच सादर केले जाईल. गडकरी यांनी ट्वीटमध्ये, ‘ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न मिळावे म्हणून खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून आम्ही लवकरच शेणापासून बनविलेले’ वैदिक पेंट ‘बाजारात आणणार आहोत असे लिहले आहे.

या रंगाचं नाव वैदिक पेंट आहे. हा रंग इको फ्रेंडली असून अविषारी, अँटी बॅक्टेरियल, एँटी फंगल आणि वॉशेबल असणाऱ आहे. भिंतीला लावल्यानंतर केवळ चार तासात हा रंग सुकणार आहे. यामुळे गुरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि प्रत्येक शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न ५५ हजार रुपयांनी वाढेल, असा दावा गडकरींनी केला आहे.