विनाकारण फिराल तर वाहने जप्त होणार

31

पुणे : शनिवारी रात्रीपासून शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.मागील दोन दिवसात पोलिसांकडून नागरिकांना दुकाने बंद करण्यापासून ते विनाकारण न फिरण्याबाबत आवाहन केले जात होते.

नागरीकांना सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत कोणत्याही सबळ कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. वैध कारणे असलेल्यांना नाकाबंदीत चौकशी करून सोडण्यात येत होते.

बेशिस्त नागरिकांविरुद्ध कडक व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. केवळ तेवढ्यावरच न थांबता, गरज पडल्यास संबंधित व्यक्तींची वाहनेही जप्त केली जातील, असा इशारा सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.

शनिवार व रविवार या दोन दिवसांमध्ये नागरिकांना संचारबंदीची माहिती व्हावी, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांकडून सहकार्याची भूमिका घेण्यात आली होती.