ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांचे वय 84 वर्षांचे होते. ठाण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांना एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील ते गाजलेले अभिनेते होते. अनेक मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. ‘अगंबाई सासूबाई’ ह्या मराठी मालिकेत ते सध्या काम करत होते.
झी मराठीवरील ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकेतील आशुतोष पत्की म्हणजेच, सोहमच्या आजोबांची भूमिका ते साकारत होते. कमी वेळातच रवी पटवर्धन यांनी साकारलेल्या या मालिकेतील आजोबांच्या भूमिकेवर महाराष्ट्राने प्रेम केले. त्यांचे मालिकेतील कडक स्वभावाचे पात्र आणि सोहमला ‘सोम्या,कोंबडीच्या’ असं म्हणणारे दत्तात्रय कुलकर्णी या भूमिकेने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले.
त्यांच्या मागे दोन मुलं, सून, नातवंडे असा परिवार आहे. रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्र्ह बॅंकेत नोकरी करत होते. नोकरी सांभाळत त्यांनी नाटकात काम करण्याची आवड जोपासली. त्यांच्यावर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.