महाबळेश्वर येथे जन्मलेले पत्रकारिता, समीक्षा, बालसाहित्य, ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे निधन वयाच्या 83 वर्षी झाले आहे. खूप वर्षांपासून ते पार्किसन्सने या कारणाने आजारी होते. आज दुपारी बाराच्या सुमारास राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतरच्या इच्छेनुसार त्यांचे डोळे दान करण्यात आले.
शंकर सारडा त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांना लिखाणाची आवड लहानपणापासून होती. त्या वेळेपासून त्यांचे लिखाण प्रसिद्ध व्हायला सुरवात झाली होती. त्यांचे शिक्षण पुणे आणि मुंबईत झाले. बालसन्मित्र बाललेखांचे संपादन, साधना साप्ताहिकाचे सहसंपादक, तसेच विविध दैनिकांमध्ये वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केले.
चतुर चंपा, मधुमुरली, राणीपरीची कृपा, झिपऱ्या आणि रत्नी, गुराख्याचा पोर, चंद्रपरी आणि सोनसखा, राक्षसाने उचलली टेकडी, नंदनवनाची फेरी, मला मोठं व्हायचंय, देवदुताचं दुःख, सोन्याच्या टेकडीचा शोध, जादूमंतर छू, शर्थ पराक्रमाची, मर्कटराजाच्या लीला, मांत्रिकाची जिरली मस्ती, हे बालसाहित्य तसेच समीक्षा, पुस्तकांचे जग, दूरदेशीचे प्रतिभावंत, लवंगी मिरच्या (हास्यकथा), जय भोलानाथ (नाटिका), बोलके कमळ, केनेडी (चरित्र) आणि कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत. अंकुर साहित्य संमेलनांचे आयोजनात सहभागी आणि महत्त्वाची पदेही त्यांनी भूषविली होती.